Description
माणसांची आयुष्यं पुढं सरकत असतात. त्यात सुखाच्या सावल्या लाभत नाहीत असं नाही; पण खूपदा त्या जास्त काळ टिकत नाहीत. दु:खाचे ढग मात्र बराच काळ भेडसावत असतात. नाती जेव्हा आधार बनतात त्यावेळी माणसाच्या मनातील सगळ्या रंगाचे एक छानसे इंद्रधनुष्य बनते; पण कधी नात्यांचाच चक्रव्यूह बनतो आणि मग मनातले हेच सगळे रंग रौद्र रूप धारण करून घाबरवून सोडतात. मन विषण्ण करतात.
कधी कधी वाटतं या मनरंगाचा आणि नात्यांचा खेळ विधाता माणसांकरवी खेळवून घेतो. जगाच्या रंगभूमीवर त्याच्या मनानुसार माणसं कठपुतळ्यासारखी हलत राहतात. परिस्थितीनुसार वाकत, झुकत, खेळत राहतात. मीही कुठंतरी या खेळाचाच एक हिस्सा आहे. हाच खेळ खेळता खेळता आजूबाजूला पाहात या खेळांनाच शब्दाचं रूप देऊन ते खेळ कागदावर उतरवत आहे इतकंच. आणि हे सगळं कागदावर उतरवताना माझ्याही सगळ्या तनामनाचं अक्षर बनून गेल्यासारखं वाटतं.