Description
या एकूणच कथानांतून आलेलं आत्मगत चिंतन इतकं बहुपदरी आहे की, यातून अनेक कथनं, काव्य, निरूपणं समोर येतात. लेखकाच्या समृद्ध वाचनाची, त्याने अनुभवलेल्या अनुभव विश्वाशी जोडून घेतात, त्यामुळे या ललित गद्यातून आलेल्या हकिकती या केवळ लेखकाच्या न राहता त्या आपल्या होतात हे या ललितगद्याचे यश आहे. गावाकडून शहराकडे गेलेल्या, गावाशी नाळ जोडून, तोडून असलेल्या कुणालाही नॉस्टल्जिक करतात.
'राखेत काही उरल्याचा शोध म्हणजे माझं सांडणे-' हे लेखकाचं निवेदन आपल्याला या लेखनाकडे कोणत्या पायवाटेनं जावं हे सांगतं. पुस्तकाच्या शीर्षकातच लेखकाने पुस्तकाच्या स्वरूपाचे सूतोवाच केले असल्यानं लक्षात येतं की, कवी असलेल्या माणसाचे हे संवेदन आहे, ते जसे हळवे आहे, माणूसपणाची गोष्ट शोधणारे, झाडाशी, पाण्याशी, मातीशी मैत्र जपणारे आहे, तसेच ते वाटेत भेटणाऱ्या दांभिकतेवर, माणूसपण
गमावणाऱ्या घटीतावरही उच्चरवात बोलणारे आहे. इथे केवळ आत्मगत चिंतन नाही, तर एक स्पष्ट असा विचार जो लेखकाने त्याच्या जीवनानुभवातून, अभ्यासातून, वाचनातून, संस्कारातून मिळवला आहे. त्याचा एक परिणाम या सगळ्या संवादामागे आहे. म्हटलं तर या वेगवेगळ्या नोंदीही आहेत. यात माणूस आणि निसर्ग, माणूस आणि गाव, लहानपण आणि प्रौढत्व, मैत्र, प्रेम, ईर्षा, लालसा, वासना, शारीरी, अशारीरी प्रेम,
ओढ आहे. त्याचा लेखकाने कसा स्वीकार केला, नकार दिला हे सगळंच एक निरूपण रचणारं आहे, सहज, मुक्त नैसर्गिक असलेली प्रत्येक गोष्ट आपण कशी निरूपीत करून टाकली. हे कथन इथे वारंवार आलेलं आहे.
- मंगेश काळे