Description
‘शोकनाट्य’ या विषयावर मराठीत स्वतंत्र व सविस्तर लिखाण फारसे नाहीच! एखाद्या पुस्तकात एखादे छोटेसे प्रकरण असा प्रकार दिसतो. तसेच, मराठी पलीकडे, अपरिहार्यपणे, जाऊन व भारतीय साहित्या व्यतिरिक्त अन्यत्र शोकनाट्य कसे व किती रुजले आणि त्याचा विकास, गती, प्रगती, अवनती, वाटा आणि वळणे कोणती आणि कां? या प्रश्नांचा सम्यक विचारही कुठे फारसा झालेला नाही. प्रस्तुत ग्रंथात तो मांडण्याचा विनम्र प्रयत्न आहे.
युरोप आणि अमेरिकेत इंग्रजी भाषा वाङ्मयाचा प्रचार आणि प्र्रभाव वादातीत आहे. फ्रान्स, जर्मनी आणि रशिया येथे तेथील भाषात निर्माण झालेल्या महत्त्वाच्या व श्रेष्ठ साहित्यकृती वेगाने इंग्रजीत अनुवादित झाल्या व होत आहेत. त्यामुळे जागतिक वाङ्मयाच्या संदर्भातही इंग्रजी भाषेतील साहित्याचे (स्वतंत्र व अनुवादित) स्थान मध्यवर्ती दिसते. प्रारंभीच्या मराठी साहित्यावरील इंग्रजी साहित्याचा प्रभाव सर्वमान्य आहे. आधुनिक मराठी साहित्यिकांवरील असा प्रभाव खूप लक्षणीय आहे.
शोकनाट्याची चिकित्सा व साहित्यरूपांची चर्चा करतांना वरील कारणांमुळे इंग्रजी भाषेत प्रसिद्ध झालेल्या साहित्यावर भर देणे अपरिहार्य ठरले तरी भारतीय विशेषत: मराठीतील (आधुनिक) शोकनाट्याचा यथायोग्य विचार केला आहे.