Description
सालटेस्च्या शिवाराशेजारीच समुद्रकिनार्यावर एक अत्यंत मोठे आणि देखणे गलबत उभे होते. त्या गलबताची शिडे सूर्यास्ताच्या-मावळत्या तांबड्याभडक किरणांनी रंगवलेली दिसत होती. आणि गलबतांवरचे ध्वज वारा प्यालागत बेफाम फडफडत दिसत होते. ते सारे दृश्य पाहून त्या गृहस्थाचे मन जरासे गडबडले. इतक्या सुंदर गलबतासाठी मी माझे प्राणदेखील गहाण ठेवीन असे त्याला वाटले. समुद्राच्या पश्चिमेकडे तोंड करून, ते गलबत जरी उभे होते तरी पश्चिमेच्याच दिशेने ते गलबत हाकारले जाणार नव्हते. होय, काळ्या समुद्रात आपले गलबत सोडून पृथ्वीच्या पश्चिमेकडचे टोक गाठण्याची कुणाची हिंमत झाली असती? दक्षिणेला गायनाकडे किंवा पूर्वेला गोल्डनहॉर्नकडे किंवा कधी कधी उत्तरेला आइसलंडपर्यंत गलबते जात असत; परंतु अज्ञात अशा पश्चिम दिशेला खळाळणार्या समुद्रात आपले गलबत न्यावे असे कुणाच्याच मनात आले नव्हते. मग तसे धाडस करणे तर दूरच राहिले.