Description
या कादंबरीत लेखकाने व्यवस्थेचे आकलन केले आहे. काशी, प्रयाग, गया, रामेश्वर या सारखी तीर्थक्षेत्रे मुक्तीचे भारलेपण आपणात घेऊन आहेत. ती खरंच मुक्तीची द्वारे आहेत का? मुक्ती म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न ही कादंबरी करते. मुक्तीच्या अनुषंगाने शोध घेताना ही कादंबरी उत्तरे देत जाते. तत्त्वज्ञानाच्या गूढ पातळीवर व्यक्त होते. ही वरवरची कादंबरी नाही. अध्यात्माचे अनेक सूक्ष्म पापुद्रे उलगडत जाते. आपणास तत्त्वज्ञानाचा साक्षात्कार घडवत जाते. जीवनावर क्रमाक्रमाने भाष्य करत राहते. विश्व हे अनंत आहे. त्याचा धागा पकडण्याचा प्रयत्न लेखकाचा आहे. माणसांच्या मनात देवाविषयी भीती आहे. उत्सुकता आहे. याचे भांडवल करून निर्माण झालेले तत्त्वज्ञान हे परिपूर्ण कसे नाही यावर ही कादंबरी भाष्य करते. कादंबरीचा आवाका व्यापक आहे. तो कवेत घेण्यासाठी वाचकालाही आपली दृष्टी व्यापक करावी लागेल. महाद्वारमध्ये जी एक व्यवस्था रेखाटली होती त्याच्या पुढे जाऊन ‘पिपिलिका’मध्ये रेखाटली आहे. यात गंधवाला ही एक व्यक्तिरेखा आहे ती खूप महत्त्वाची आहे. गोपालन करणार्या लोकांचे चित्रण यात येते. त्या अनुषांगाने असणारी आर्थिक गणिते येतात. अशा अनेक समकालीन घटना प्रसंगाच्या माध्यमातून कादंबरीने समकालीन भारत उभा केला आहे. भारतीय जीवनाचेस्तर अनेक पातळ्यांवर रेखाटलेले आहे. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. जैन धर्म असो, ख्रिश्चन धर्म, मुस्लीम धर्म असो, की बौद्ध धर्म असो या सर्व धर्मातील मुंगीचा प्रवास हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. प्रचंड अभ्यास आणि मेहनतीची आवश्यकता त्यासाठी लागते. मानवी जीवन सुसह्य व्हावे म्हणून एक व्यवस्था अस्तित्वात येते. नैतिकता व अनैतिकतेची संकल्पना अस्तित्वात येतात. या कादंबरीत अध्यात्माच्या अनेक संकल्पना सूक्ष्म पातळीवर स्पष्ट केल्या आहेत.