Description
बदलती नाती आणि त्यामधील संघर्ष, भाऊबंदकी हा काही वेळा कळीचा प्रश्न निर्माण झाला. या सगळ्याचा गुंता आणि गोफ म्हणजे महाभारत आहे. मी हे जाणून घेताना जे माझ्या मनात उमटलं ते त्यातील पात्रांच्या अनुषंगाने यातून मांडण्याचा प्रयत्न केला. या रूढार्थाने कथा नाहीत, त्या त्या पात्रांचं मन-मंथन आहे. घडलेल्या घटनांकडे मागे वळून पाहाणं आहे. स्वतःच्या मनाचा तळ-डोह तपासणं आहे. यातील व्यक्तिरेखा लिहिताना त्या व्यक्तिरेखांच्या आयुष्यातील सगळ्याच घटनांचा ऊहापोह घेणं हा हेतू नाही, पण काही महत्त्वाच्या घटनांच्या ओरखड्यांचा, व्यथांचा हिशोब लावणं आहे. त्यावेळच्या संवेदनांचा शोध घेणं आहे. पात्रांच्या अंतरंगात शिरून मनावरचे पापुद्रे अलग करण्याचा हा प्रयत्न आहे. घटना, प्रसंग बदलत नाहीत. पण कारणमीमांसा शोधताना आयुष्यात बाकी काही उरते का, हे पाहण्याचा हा प्रयत्न.
नाती तपासून पाहताना खूप काही सापडलं जातं, गांधारी-कुंतीमधील नातं असो की द्रौपदी-कृष्णामधील. नात्यामधले अदृश्य अवकाश अनेक प्रसंगांत खूप काही सांगून जातात. महाभारत म्हणजे विविधरंगी नात्यांचा महाकाय पट आहे. या पटावरील काही व्यक्तिरेखांचे अंतरंग जाणून त्यांच्या व्यथांचा शोध घेण्याचा प्रयत्न म्हणजे ‘व्यथापर्व’ आहे.