Description
भाषाभ्यासाच्या अवकाशाचा विस्तार खूप मोठा आहे. समाजशास्त्रापासून प्रॅग्मॅटिक्सपर्यंत अनेक ज्ञानशाखा भाषेचा वेगवेगळ्या अंगांनी अभ्यास करू लागल्या आहेत. सोस्यूर- चॉम्स्की यांच्यापासून विल्यम लबव, बाख्तिनपर्यंत अनेकजण भाषेचा विविध अंगांनी शोध घेत आहेत. अगदी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही भाषाभ्यास महत्त्वाचा ठरू लागला आहे. युनिकोडच्या माध्यमातून बिनचूक होणारे मराठी टंकलेखन असो की, इमोजीच्या माध्यमातून भाषांचा विस्तार झालेला असो, भाषा ही महत्त्वाची ज्ञानशाखा आहे, हे आता सर्वमान्य झाले आहे. ती केवळ बोलण्याचे अथवा संपर्काचे आणि संप्रेषणाचे माध्यम अथवा साधन नाही, तर तिच्यात संस्कृतीचा मोठा भाग दडला आहे, हे लक्षात घेऊन भाषेचा अभ्यास होऊ लागला आहे. जगभर हे चित्र असले तरी मराठी भाषेच्या संदर्भातील चित्र फार आशादायक आहे, अशातला भाग नाही. आजही पारंपरिक दृष्टिकोन स्वीकारूनच मराठीचा विचार केला जातो. अपवादात्मक स्वरूपात काही भाषाभ्यासक आणि विद्यापीठीय अभ्यासक्रम सोडले, तर मराठीचा फार अभ्यास होताना दिसत नाही. अर्थात विद्यापीठीय क्षेत्रात होणारा अभ्यासही फार समाधानकारक आहे, अशातला भाग नाही. तिथेही या शाखेच्या अभ्यासाला भरपूर वाव आहे.
भाषेच्या अभ्यासाचा विस्तारत जाणारा अवकाश लक्षात घेऊन या ग्रंथाची निर्मिती केली आहे.