Description
नव्या जगातली नवी कविता वाचताना नव्या जगाचं स्वरूप समजावून घेऊ या. ह्या जगात मीडिया, मार्केट, मनी, मॅनेजमेंट आणि मेडिटेशन ह्या पाच ‘म’कारांचं प्राबल्य वाढतंय. हे दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे, कमी होणार नाही. नवी कविता ह्या पाच ‘म’कारांचा कलात्मक आणि संकल्पनात्मक हुंकार आहे. नवं जग जुन्याच्या तुलनेत समजावून घ्यायला अधिक कठीण गोष्ट आहे. म्हणून नवी कविता समजावून घेताना आपल्याला नव्या जगाचे हे ‘म’कारात्मक संदर्भ लक्षात ठेवायचे आहेत. प्रस्तुत निबंध जसा नव्या कवितेबद्दल आहे, तसाच तो नव्या जगाबद्दलसुद्धा आहे. ह्या कवितेबद्दल बोलताना नव्या जगाचे, म्हणजेच जागतिकीकरणाचे संदर्भ अटळ आहेत. जग आणि कविता हे नातं आई-मुलासारखं जैविक असतं. जशी आई तसं मूल. जसं जग, तशी कविता. जसा अनुभव तशी अभिव्यक्ती.